सिडको ते जय भवानी चौक रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा
सिडको उड्डाणपूल ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानक रस्त्याच्या कामाला आता कुणी वाली राहिलेला नाही. अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या सरकारने या रस्त्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता मात्र सरकार बदलल्या नंतर हे काम आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही.या रस्त्याबाबत मनपाने अजबच शक्कल लढवल्याचे समोर आले आहे.तीन फूट रस्ता सिमेंटचा तर त्यापुढे पुन्हा खड्डे,पुढे सिमेंटचा रस्ता पुन्हा एकदा खड्डे अशा स्वरुपात अर्धवट काम करण्यात आले आहे.
दिपाली हॉटेल सिडको ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानक हा संपूर्ण रस्ता गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवून याठिकाणी संपूर्ण रस्त्यावर खडी, माती पसरली असून यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होतात. वाहनधारकांची खड्डे चुकण्याची एक वेगळीच शर्यत येथे होते. पालिकेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की दीपाली हॉटेल ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचे काम महापालिका करणार आहे. त्यानुसार काम सुरुही झाले. मात्र सदर कंत्राटदाराने अजब गजब पद्धतीने काम सुरु ठेवले. सुरुवात जिथून होते तो सिडको दिपाली हॉटेल ते कम्युनिटी सेंटरच्या पुढे पर्यंत अगदी खराब रस्ता आहे ज्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता अजूनही तसाच आहे. त्याच्या पुढे मधूनच रस्त्याचे काम सुरु केले गेले. येथून पुन्हा अर्ध्या पर्यंत रस्त्याचे काम करुन सोडून देण्यात आले.काही फुटांचे काम करुन पुन्हा परिस्थिती जैसे थे. दुसर्या बाजूने देखील असेच हाल. त्यामुळे या रस्त्याची दुर्दैशा आजही कायम आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमुक्त होतोय का याकडे नागरिकांचे लक्ष आहे.